जळगाव मिरर | १४ जुलै २०२५
कांचन नगरातील अष्टभूजा चौकात रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा केल्यानंतर टवाळखोरांनी खांब्यावर लावलेल्या तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. पोलिसांनी कॅमेरे फोडणाऱ्या गोविंदा मुरलीधर बाविस्कर (वय १८, कांचननगर) व संजय नाना सौदागर (वय १९, मूळ रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, ह. मु. अष्टभूजा चौक कांचननगर) यांना रविवारी सकाळी ताब्यात घेतले. शनिपेठ पोलिसांनी खाक्या दाखवित परिसरातून धींड काढण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याकरीता जिल्हा पोलीस दलाकडून संपूर्ण शहरात नेत्रम प्रणालीद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागावर पोलिसांची करडी नजर आहे. शहरातील कांचन नगरात देखील सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहे. त्या परिसरात राहणाऱ्या गोविंदा बाविस्कर या तरुणाचा आज वाढदिवस होता, त्यामुळे त्याच्या मित्रांनी मध्यरात्रीच केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले. त्यानुसार मित्राचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केल्यानंतर वाढदिवस साजरा करणाऱ्या टवाळखोरांनी तेथे विजेच्या खांबावर लावलेले शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे दगड मारुन त्याची तोडफोड केली. याबाबतची माहिती नेत्रमकडून शनिपेठ पोलिसांना कळविण्यात आली. तसेच परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी देखील शनिपेठ पोलिसात जावून तक्रार दिली होती.
टवाळखोरांनी शासकीय कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळताच, त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना तात्काळ कॅमेरे तोडणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दोघांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शनिपेठ पोलिसांनी परिसरात दहशत माजविणाऱ्या व कॅमेऱ्यांची तोडफोड करणाऱ्या गोविंदा मुरलीधर बाविस्कर (वय १८, कांचननगर) व संजय नाना सौदागर (वय १९, मूळ रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, ह. मु. अष्टभूजा चौक कांचननगर) यांची परिसरातून धिंड काढल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.
