जळगाव मिरर | १९ जुलै २०२५
जळगाव शहर पोलिसांनी वाहन चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणत, ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि इतर चोरीच्या वाहनांसह एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि,जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसमोर, मायटी ब्रदर्स दुकानासमोरून १४ जुलै रोजी रात्री ८.३० ते १५ जुलै रोजी सकाळी ९.३० दरम्यान, ६१ हजार रुपयांचा फोर्स टेम्पो (MH-१९ एस ०६६६) आणि ३० हजार रुपयांचा किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोव्हॅट जनरेटर चोरीला गेला होता. याप्रकरणी मिलींद मुकुंद यत्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी तपास पथकाला सूचना दिल्या. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी जामनेर, बोदवडमार्गे मलकापूर-नांदुराकडे गेल्याची माहिती मिळवली.
वडनेर भोईजी गावाजवळ आरोपींनी अपघात करून वाहन सोडून पळ काढला होता, परंतु पोलीस पथकाने त्यांना जवळच्या ढाब्यावर ताब्यात घेतले. मंगेश सुनील मिस्तरी (वय २०, रा. कांचन नगर, जळगाव) आणि यश अनिल सोनार (वय २०, रा. समता नगर, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. या कारवाईत चोरीला गेलेला जनरेटर व्हॅन, एक टाटा एस मालवाहतूक चारचाकी वाहन आणि पाच मोटारसायकल असा एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच, जळगाव शहर पोलीस ठाण्यातील १, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील ३, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील २ आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यातील १ अशा एकूण ७ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
यांनी बजावली कामगिरी !
ही यशस्वी कारवाई गुन्हे शोध पथकातील सपोनि सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतीश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, पोना भगवान पाटील, पोकॉ. अमोल ठाकूर, भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार तसेच नेत्रम येथील पंकज खडसे, मुबारक देशमुख यांनी केली.
