जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२५
राज्यातील नागपूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील गिट्टीखदान पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, ती आठ विवाहित पुरुषांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. संबंधित महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांशी संपर्क साधत होती. त्यांच्याशी लग्न करून अवघ्या काही दिवसांतच भांडण उकरून काढत असे आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात करत होती.
या प्रकरणातील आरोपीचं नाव समीरा फातिमा असून ती उच्चशिक्षित असून, एका शाळेत शिक्षिका म्हणूनही काम करत होती. समीरा ही गेल्या दीड वर्षांपासून फरार होती. तिने विवाहित पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी निकाह केला आणि नंतर खोट्या आरोपांच्या धमक्यांनी त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले.
समीरा फातिमाविरुद्ध गुलाम पठाण यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर तपास करण्यात आला आणि पोलिसांनी सिव्हिल लाइन्स परिसरातील एका टपरीवर चहा प्यायला आलेल्या समीराला अटक केली. पोलिस चौकशीत तिच्या आठ लग्नांचा व त्यातून केलेल्या आर्थिक फसवणुकीचा तपशील समोर आला आहे.
तिने 2010 पासून हे फसवणुकीचे सत्र सुरू ठेवले असून, घटस्फोट झाल्याचं खोटं भासवून ती विवाहित पुरुषांना आपलं बळी बनवत होती. लग्न झाल्यानंतर महिन्याभरात भांडण करत खोट्या पोलिस केस व कोर्टातील सेटलमेंटच्या नावावर पैसे उकळण्याचा तिचा प्रकार होता. या सगळ्या प्रकारात तिने जवळपास 50 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या आरोपी महिला पोलीस कोठडीत असून, पुढील चौकशी सुरू आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
