जळगाव मिरर | संदीप महाले
गेल्या काही महिन्यापासून जन्म-मृत्यू प्रकरणासह महिला डॉक्टराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मनपातील एका अधिकाऱ्याचे निलंबन झाले असल्याची चर्चा रंगत असतांना आता आरोग्य विभागातील भोंगळ कारभार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी शहरातील सर्वच नाल्यांची साफसफाई करण्यात येत असते मात्र आता शहरातील प्रभाग क्र.१ मधील एका मोठ्या नाल्याची साफसफाई झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या नाल्याची साफसफाई न झाल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाळा येण्यापूर्वी शहरातील ५ मुख्य नाले व शहरातील १०२ उपनाल्याची साफसफाई मोहीम करण्यात येत असते. यंदा देखील ही मोहीम करण्यात आली. मे व जून या महिन्यात ही मोहीम ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात आली होती मात्र या मोहिमेला एक महिना पूर्ण होत नाही तोच आता शहरातील प्रभाग क्र.१ म्हणजेच इंद्रप्रस्थ नगर मागील सिद्धीविनायक कॉलनी, लक्ष्मी नगर व शिव शंकर कॉलनी परिसराला लागून एक मोठा नाला आहे. याठिकाणी आज दि.७ ऑगस्ट रोजी पहिले असता. याठिकाणी कुठल्याही प्रकारची साफसफाई करण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. तर या एकाच नाल्यावर ज्या ठिकाणी घरे आहेत. याठिकाणी या नाल्यावर कुठलेही झाडे जगलेले दिसत नाही तर अर्ध्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात झाडे जगलेली दिसून येत आहे. म्हणजेच याठिकाणी नाल्याची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी केली होती साफसफाई चकाचक !
प्रभाग क्र.१ मधील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले कि, मागील महिन्यात या नाल्याची साफसफाई चकाचक करण्यात आली होती. त्यामुळे नालेसाफसफाई मोहीम चांगल्या पद्धतीने झाली आहे. असे त्यांचे उत्तर होते, मात्र ‘जळगाव मिरर’ टीमने याठिकाणी पाहणी केली असता. याठिकाणी कुठल्याही प्रकारची साफसफाई झालेली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अधिकारी देखील या नालेसाफसफाईचा ठेकेदारासोबत हातमिळवणी केली कि काय? असा संशय येवू लागला आहे.
नाले साफसफाई मोहिम संशयाच्या भोवऱ्यात ?
जळगाव मनपाच्या माध्यमातून एका ठेकेदाराला मुख्य नाल्यासह उपनाल्याची साफसफाई करण्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र शहरातील अनेक ठिकाणी नाल्यांची साफसफाई अद्याप झालेली दिसून आलेली नाही त्यामुळे हि नाले साफसफाई मोहीम आता संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
आणखी सविस्तर पुढील भागात….
