
जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना मोठ्या प्रमाणावर गाजली होती. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत राजकीय फायदा झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र आता या योजनेचा गैरवापर समोर आला असून, तब्बल 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार अपात्र असल्याचे उघड झाले आहे.
ही धक्कादायक माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ट्विटद्वारे जाहीर केली. त्यांनी सांगितले की, “माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यभरातील सुमारे 26 लाख लाभार्थी हे योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाहीत.”
या प्रकरणाची सखोल तपासणी सुरु असून, प्राथमिक स्वरूपाची माहिती जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक लाभार्थ्याच्या पात्रतेची सुक्ष्म छाननी करण्यात येत आहे.
छाननीनंतर जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पावले उचलली जातील, असे त्यांनी नमूद केले. तसेच जे लाभार्थी पात्र ठरतील, त्यांचा लाभ नेहमीप्रमाणेच पुढे सुरू राहील, अशीही ग्वाही सरकारने दिली आहे.




















