जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२६
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे तुषार (तानिया) उर्फ अनंत बाऊस्कर (वय ३१) या किन्नराचा १६ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार उर्फ तानिया बाऊस्कर हे फुलगाव येथील रहिवासी होते. तर, १६ ऑगस्टला सायंकाळी राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरील पंख्याच्या हुकला साडीने त्यांनी गळफास घेतल्याची घटना निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व नागरिकांनी पोलिसांना ही माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तर, घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पो.हे. कॉ. गणेश राठोड तपास करत आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून विविध बाबींची चौकशी करण्यात येत आहे. तर, तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेबाबत माहिती समोर येणार आहे. दरम्यान, फुलगाव परिसरात या घटनेची माहिती पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे.





















