
जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२५
गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाबाबत लढा देत असून आता मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यांनी पुन्हा एकादा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे. २९ अॅागस्टला राजधानी मुंबईत आझाद मैदानावर त्यांना एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. आज ते पुणे जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवरून मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, आडमुठी भूमिका सोडून द्या, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हटलं आहे.
मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरून सांगतो देवेंद्र फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला मरेंपर्यंत तुमचे उपकार विसणार नाही, हा आमचा शब्द आहे, असं मनोज जरांने पाटील यांनी म्हटलं आहे. या संधीचं सोनं करा, तुम्ही आमचे वैरी नाहीत. फक्त मराठाविरोधी भूमिका सोडा, असंही जरांगे म्हणाले आहेत.
शिवनेरी किल्ल्यावर दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठ्यांच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली पाहिजे, असं म्हटलं आहे. याशिवाय आम्ही मुंबईला जाणारच असा ठाम निर्धार केला असल्याचं यावेळी त्यांनी बोलताना जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.
२९ अॅागस्ट या दिवशी जरांगे यांना आझाद मैदानार एका दिवसाची आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. यावर बोलताना जरांनेंनी ही परवानगी म्हणजे चेष्टा आहे, असं म्हटलं आहे. न्यायदेवतेनं सांगितलं परवानगी घ्या. त्यानंतर 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकता. जाणूनबुजून तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली, असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जरांगे पुणे जिल्ह्यात होताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. किल्ले शिवनेरीवर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. रायगड शिवनेरी येथून प्रेरणा मिळते, असं ते म्हणाले.
२९ अॅागस्टला मुंबईत आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच आता सरकारकडून जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याअगोदर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.




















