जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२५
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जळगाव या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलन केंद्र चालविण्यात येत आहे. परंतु, सदर केंद्रामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असून, संस्थेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच परिसरातील नागरिक यांना गंभीर आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर ठिकाणी उघड्यावर कचरा साठविला जात असल्यामुळे माशा, डास, उंदीर आणि इतर रोगकारक कीटकांचा उपद्रव वाढलेला आहे.
याशिवाय, सदर केंद्राच्या समोरच शासकीय तंत्रनिकेतन हे अत्यंत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थान आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. सध्या परिस्थिती ही सार्वजनिक आरोग्य अधिनियम 1949 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 यांचे सरळसरळ उल्लंघन करणारी असून, मनपाच्या नियोजनशून्यतेमुळे विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सदर कचरा केंद्र हे मुख्य रस्त्यालगत असल्याने, शहराच्या सौंदर्यावरही याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. जिथे लोकसहभागाने स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे, तेथे मनपाच्याच निष्काळजीपणामुळे असा गलिच्छतेचा सडा पडलेला असणे अत्यंत लज्जास्पद आहे. अतः आपल्यास यापूर्वी अनेक वेळा मौखिक व लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – जळगाव यांच्या वतीने आम्ही या पत्राद्वारे स्पष्टपणे सूचित करीत आहोत की, सदर कचरा संकलन केंद्र तत्काळ व कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. तसेच दिनांक १ सप्टेंबरपासून शहर स्वच्छतेचे काम नव्या एजन्सीकडे सोपविण्यात येत आहे, त्यामुळे त्या एजन्सीला देखील या केंद्रासंबंधी तातडीने लेखी सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून सदर केंद्र कायमस्वरूपी बंद राहील. अन्यथा, आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून उग्र आंदोलन छेडण्यास बाध्य होऊ. यास सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेवर राहील. आपली तातडीची कारवाई अपेक्षित आहे.
यांनी दिले निवेदन
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळले, उपमहा नगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील, संदीप मांडोळे,ॲड सागर शिंपी, भूषण ठाकूर, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे, लताबाई तायडे, नजमा तडवी, उपस्थित होते.