
जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२५
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याची ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयटी सर्कल येथे कारखाली चिरडून हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे जनतेत दहशत पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विठ्ठल गायकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो शिवसेनेचा स्थानिक कार्यकर्ता होता. त्यांची काल रात्री 9 च्या सुमारास संतोष पवार नामक आरोपीने कारखाली चिरडून निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपी संतोष पवार कारसह फरार झाला. पण श्रीनगर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीची कार जप्त केली. पोलिसांनी आरोपीच्या एका सहकाऱ्यालाही अटक केली आहे. श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी या घटनेविषयी सांगितले की, आरोपीच्या शोधासाठी 3 विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे.
दुसरीकडे, घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यात गुंड संतोष पवार हा विठ्ठल गायकर यांना कारखाली चिरडून ठार मारताना दिसत आहे. प्रथम तो गायकर यांना कारने धडक देतो. त्यानंतर ते खाली पडल्यानंतर कार त्यांच्या छाती व डोक्यावर घालतो. आरोपी संतोष पवारवर यापूर्वीसुद्धा अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून घडल्याचेही सांगण्यात येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या घटनेनंतर ठाण्यातील गुन्हेगारी स्वरुप व त्यातील नवनवीन पॅटर्नकडे लक्ष वेधले गेले आहे. गुंड आता पूर्वीप्रमाणे शस्त्राने नव्हे तर गाडीखाली चिरडून ठार मारताना दिसून येत आहेत. पोलिसांपुढे आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान आहे.




















