
जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२५
चोपड्याहुन नवा मोबाईल खरेदी करून दि.८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी जाणाऱ्या तालुक्यातील वर्डी येथील टेमरया उर्फ रगन जगन बारेला व मगन जगन बारेला या दोन सख्या भावांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अडावदकडून चोपडाकडे भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मयत तरुणांच्या आई, वडील, वहिणी व पत्नीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला.
दरम्यान, तालुक्यातील वडीं येथील रहिवासी असलेले टेमरया उर्फ रगन जगन बारेला (वय १८) व मगन जगन बारेला (वय ३०) हे दोन्ही सख्खे भाऊ दुचाकीने चोपडा येथे नवीन मोबाईल विकत घेण्यासाठी आले होते. मोबाईल व किरकोळ बाजार करून ते वडीं येथील घरी जात होते. दरम्यान चोपडा ते अडावद रस्त्यावरील माचला फाट्यापुढील सुरेश पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगात येणाऱ्या एका लाल रंगाच्या क्रेटा (एमएच ०४, एचएफ ८२९६) या चारचाकीने त्यांची दुचाकी (एमएच १९, एव्ही ८५८२) ला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मगन बारेला हा जागीच ठार झाला, तर टेमरया चारेला याचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. चारचाकी वाहन मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई अडावद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यत सुरु होती.




















