जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२५
नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदीविरोधात Gen-Z अर्थात तरुणाईने आक्रमक पवित्रा घेतला आहे. Gen-Z ने थेट संसद, राष्ट्रपती भवनवर आक्रमण केल्यानंतर आज थेट कायदेमंत्र्यांचं घरच पेटवून दिलं. इतकंच नाही तर नेपाळमधील के पी ओली सरकारमधील 9 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सरकारची ध्येयधोरणं आणि सोशल मीडियाबंदीविरोधात तरुणाईची भूमिका यावरुन हे राजीनामासत्र सुरु आहे. तिकडे नेपाळमधील बीरगंज इथं नेपाळ सरकारचे कायदेमंत्री अजय कुमार चौरसिया यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं. नेपाळमधील या आक्रमक आंदोलनानंतर मोठा हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये आतापर्यंत 25 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये कृषी, शिक्षण मंत्री , आरोग्य मंत्री आणि माहिती प्रसारण मंत्र्यांचा समावेश आहे. नागरिकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, लोकशाहीवर निर्बंध आणले जाऊ शकत नाही असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे. नेपाळ सरकारने एक नवीन विधेयक संसदेमध्ये आणलं आहे, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना स्थानीय प्रतिनिधी नियुक्त करणे, नोंदणी आणि जबाबदारीचे नियम ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, त्या देशातील युवकांना, तरुणांच्या गटांना हा नियम म्हणजे सेन्सॉरशिप वाटते.
Nepal Banned Apps List : बंदी आणण्यात आलेले अॅप्स कोणते?
नेपाळमध्ये 26 लोकप्रिय अॅप्स जसे Facebook, Messenger, Instagram, YouTube, WhatsApp, X (पूर्वी Twitter), LinkedIn, Snapchat, Reddit, Discord, Pinterest, Signal, Threads, WeChat, Quora, Tumblr, Clubhouse, Mastodon, Rumble, VK, Line, IMO, Zalo, Soul, Hamro Patro इत्यादींवर बंदी लागू करण्यात आली आहे.
पीएम ओली यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी सोमवारी संध्याकाळी 6 वाजता सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यांनी सांगितले, “मी सध्याच्या परिस्थितीचे मूल्यमापन करून त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित पक्षांशी संवाद साधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संध्याकाळी 6 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या कठीण काळात शांतता राखावी, अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो.”