जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२५
महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी लाडकी बहिण योजना महत्वाची ठरली असून आता प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेती प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी तसेच शेतमालाचे दर व शेतकरी आत्महत्या या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच लाडकी बहीण योजने वरून सुद्धा बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, राज्य सरकार आता सांगत आहे की आमच्याकडे पैसे नाहीत. मात्र, निवडणुकी अगोदर तुम्ही लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकत्र पैसे दिले. जशा निवडणुका झाल्या तशा अर्ध्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या. पैशाअभावी लाडका भाऊ प्रशिक्षणार्थी योजना ही बंद करुन टाकली. कारण हा फक्त निवडणूकीपुरते कार्यक्रम होता. हा मदत म्हणून कार्यक्रम नसून त्यांचा राजकीय वापर करून घेण्यासाठी होता, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, मला वाटते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही हेच माहिती नाही. कारण प्रशासन ठेवून सगळा माल जमा करायचा आहे. ना नगरसेवक, ना जिल्हा परिषद सदस्य सगळा नियंत्रण एकाच ठिकाणाहून करायचे आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यालयातून चालावा. ईव्हीएम देखील भाजपाच्या कार्यालयात ठेवा लोक येतील बटन तुम्ही दाबा, असा हल्लाबोल कडू यांनी केला आहे.
जयकुमार गोरे यांना भाजपाचे डोके आहे. त्यांना लोकांची डोकी थोडीच आहेत. आमचे डोके हे सामान्य लोकांचे डोके आहे. आमदारांचे पगार जर दहा वर्षात 70000 वरुन तीन लाखापर्यंत जात असेल आणि दिव्यांग बांधवांचा निधीसाठी लढावे लागत असेल, सोयाबीन 3400 रुपयांना विकावे लागत असेल, कापसावर शुल्क लागणार असेल, तर मग करणार काय? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, आता आम्हाला सांगता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत. देशातील 200 उद्योगपत्यांचे तुम्ही 18 ते 24 लाख कोटी कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांचे 30 ते 40 हजार कोटी कर्ज माफ करायला काय होते असे कडू म्हणाले. आमचे सोयाबीन, तूर, धान याला 20 टक्के बोनस द्यायला पाहिजे, त्यासोबतच जीएसटीचा परतावा देणार असेही सांगितले होते, मात्र काहीच होते नाही असे कडू म्हणाले.
तसेच अतिवृष्टी झाली त्यावर कोणी बोलायला तयार नाही. सोयाबीन 3 हजार 400 रुपयांनी विकायला निघणार आहे त्यावर सरकार बोलायला तयार नाही असे कडू म्हणाले. 15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाली नाहीतर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार असल्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.