जळगाव मिरर । १९ सप्टेंबर २०२५
राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी जळगाव शहरात आक्रोश मोर्चा काढल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून बळजबरी प्रवेशद्वार उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केल्याचा प्रकार बुधवारी घडला होता. या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू तसेच शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि इतर पक्षांच्या ११ पदाधिकाऱ्यांविरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि , जळगाव शहरात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या माध्यमातून काळ्या फिती लावून तसेच काळे कपडे घालून सरकारचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करून केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. शिवसेनेचे (उद्वव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि शेतीप्रश्नांशी संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी यावे, असा आग्रह आंदोलकांनी धरला. मात्र, बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही जिल्हाधिकारी किंवा दुसरे कोणी अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलनस्थळी आले नाही. त्यामुळे संतप्त झालेले माजी खासदार पाटील आणि बच्चू कडू हे शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. पोलिसांनी आधीच मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासह उन्मेश पाटील आणि शेतकऱ्यांनी पोलीस बळाला न जुमानता बळजबरीने मुख्य प्रवेशद्वार उघडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. तेवढ्यावरच न थांबता प्रशासकीय इमारतीच्या लोखंडी चॅनेल गेटवर उभ्या असलेल्या पोलिसांचा विरोध मोडीत काढून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळवला होता.
दरम्यान, आक्रोश मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेतकऱ्यांसमोर बोलताना माजी खासदार पाटील यांनी चिथावणी देणारे वक्तव्य केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतीप्रश्नी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाला बोलावले होते. प्रत्यक्षात, बच्चू कडू यांच्यासह माजी खासदार पाटील आणि शेतकरी पोलीस बळाला न जुमनता बळजबरी प्रवेशद्वार उघडून आतमध्ये शिरले. ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. या सर्व कारणांवरून जळगावमधील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नाईक भरत चव्हाण यांच्या तक्रारीवरून आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या नेत्यांवर गुन्हा दाखल !
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील, उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे, महानगर प्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, संग्रामसिंह सूर्यवंशी, काँग्रेसचे बाळासाहेब पवार, विजय राठोड, मनसेचे ॲड. जमील देशपांडे, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संदीप पाटील आणि सुनील देवरे.