
जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२५
भुसावळ शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीला अश्लील कमेंट्स करून मानसिक त्रास देणाऱ्या तिघांविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कॉलेजमध्ये दाखल झालेल्या पीडितेच्या नातेवाइकास आणि त्याच्या मित्रास देखील आरोपींनी मारहाण करत गंभीर दुखापत केली.
सविस्तर वृत्त असे कि, ही तरुणी आपल्या दोन मैत्रिणींसह महाविद्यालयाच्या मैदानावर बॅडमिंटन खेळत होती. यावेळी आरोपी प्रणय गणेश निहारे, आदिल खान मुकीम खान व भावेश शशिकांत बहिरुने या तिघांनी मैदानाजवळ येऊन शिट्ट्या मारत अश्लील आणि अवमानकारक कमेंट्स केल्या. घटनेची माहिती मिळताच पीडितेचा नातेवाईक कॉलेजमध्ये आला आणि त्याने आरोपींना जाब विचारला. यावरून संतप्त झालेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला करत डाव्या खांद्यावर गंभीर मारहाण केली. याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्रालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.




















