जळगाव मिरर | १६ नोव्हेंबर २०२६
विद्युत मीटर तपासणीनंतर वीज उपकरणाचा भार अधिक असल्याने वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचे सहाय्यक अभियंता विशाल वसंत नेमाडे (वय ३७, रा. योगेश्वर नगर) यांच्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञांनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या महसूल व देय उपविभागाचे सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कडू तायडे (वय ४५, रा. कोल्हे हिल्स परिसर), रवींद्र छन्नू पाटील (वय ४१, रा. पंडित कॉर्नर अपार्टमेंट) हे वीज मीटर तपासणीसाठी गेले होते. तेथे बसविलेल्या नवीन वीज मीटरची तपासणी करून वीज मीटरचे व घरातील उपकरणाचे फोटो काढले. त्यानंतर भरत तायडे याने तक्रारदारास फोन करून बोलविले व तुमच्याकडे अधिक भार असल्याने वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी सहाय्यक अभियंत्याच्या नावाने ४० हजार रुपयांची लाच मागितली.




















