
जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२५
भुसावळ तालुक्यातील साकेगाव परिसरात शुक्रवारी सकाळी येथील लक्ष्मण वसंत ठाकरे (वय अंदाजे २५-३०) हा युवक वाघूर नदीच्या पुरात वाहून गेला. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू असून अद्याप तो सापडलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजता लक्ष्मण ठाकरे म्हशी चारण्यासाठी वाघूर नदीवरील जुन्या पुलावरून नदीच्या पलीकडे गेला होता. काही वेळाने म्हशी गावाच्या दिशेने धावत आल्याने, त्याने त्यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी नदीत उतरून प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी नदीचा प्रवाह अचानक वाढल्याने लक्ष्मण पाण्याच्या लाटांमध्ये अडकून वाहून गेला. ही घटना त्याचा चुलतभाऊ योगेश भगवान ठाकरे यांच्या नजरेस पडल्याने त्याने तातडीने गावकऱ्यांना कळवले. दरम्यान, वाघूर धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लक्ष्मण ठाकरे हे अत्यंत गरिबीत झोपडीत राहत होते. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या पश्चात दोन भाऊ व एक बहीण आहे. घटनास्थळी महसूल प्रशासन दुपारी दाखल झाले, तोपर्यंत गावकऱ्यांनीच शोधकार्य सुरू ठेवले होते. गावकऱ्यांनी ठाकरे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. माहिती मिळताच पोलिस पाटील गणेश भोई, प्रवीण पवार, दीपक चराटे यांच्यासह अनेक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले होते.




















