
जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२५
शहरातील तांबापुरा परिसरात राहणारा एक २१ वर्षीय तरुण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह आज शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास मेहरूण तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव शेख अबूजर शेख युनूस (वय २१, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) असे आहे. तो गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंदही करण्यात आली होती.
दरम्यान, आज सकाळी मेहरूण तलावाजवळ मासेमारीसाठी आलेल्या काही स्थानिक नागरिकांना पाण्यात एक मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती शेख अबूजर याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले. मृतदेहाची अवस्था पाहून त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करीत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. या दुर्दैवी घटनेमुळे तांबापुरा परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.




















