
जळगाव मिरर । २२ सप्टेंबर २०२५
अमळनेरातील तिघांना प्रॅकसाठी मुलांचे अपहरणाचा रील करणे चांगलेच महाग पडल्याची घटना घडली. पोलिसांनी खाक्या दाखवून नंतर तंबी देऊन त्या तरुणांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तरुणांना मोबाईलचे व्यसन जडले असून सोशल मीडियावर विविध व्हिडीओ पाहून आपणही काही तरी करावे असे सर्वांना वाटते आणि अशातूनच अमळनेरच्या तिघा तरुणांना चांगलाच ‘प्रसाद’ खावा लागला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि.१९ रोजी तीन तरुण दुपारी शहरातील शिवाजी बगीच्याजवळ तोंडाला रुमाल बांधून मुलांना अपहरण करण्याचा रील बनवून प्रॅक करणार होते. तिघांनी मोटरसायकलवर दोनो को उठाया है अब तिसरे को उठाना है म्हणत एका लहान मुलाकडे धावले. मुलगा घाबरला अन पळत सुटला. तेव्हढ्यात एक सैन्य दलातील तरुणाने त्यांना हटकले असता तिघांनी मोटरसायकलच्या नंबर प्लेट वरील नंबर पायाने झाकून पळ काढला. मुलगा घाबरत घरी गेला.
आपल्या पालकांना सांगितले. पालकांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले. घाबरलेल्या मुलाला पाहून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, उदय बोरसे, उज्वल पाटील, मयूर पाटील यांच्या पथकाला पाठविले पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच प्रॅक करण्यासाठी आम्ही रील बनवत होतो, असे त्यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी त्यांना कडक तंबी देऊन पालकांच्या ताब्यात दिले.




















