
जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२५
महसूल विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित व गंभीर समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या व समस्या सविस्तरपणे मांडल्या जाणार आहेत.
या बैठकीसाठी राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण (मुंबई), तसेच राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर कासार, महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष डी. एम. अडकमोल, आणि कस्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे हे शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती, पदोन्नती, रिक्त पदांची भरती, नियत वेतनाचे नियमितीकरण, व अन्य तातडीच्या समस्या सोडवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अद्यापही काही समस्या किंवा मागण्या असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत संघटनेच्या जिल्हाध्यक्षांकडे लेखी स्वरूपात किंवा प्रत्यक्ष भेटून आपली माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही बैठक महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, जळगाव जिल्हा व राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, जळगाव जिल्हा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत आहे.




















