
जळगाव मिरर । २४ सप्टेंबर २०२५
अमळनेर येथे गॅस भरण्याच्या व्यवसायासाठी दरमहा पंधरा हजार रुपये हप्त्याची मागणी करून त्यातील बारा हजार रुपये स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई पाचपावली मंदिराजवळील पान टपरीवर करण्यात आली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर येथील धुळे रोडवर राहणाऱ्या एका व्यावसायिकाने काँप्रेसरच्या साहाय्याने गॅस भरण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, अमळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी अमोल राजेंद्र पाटील व जितेंद्र रमणलाल निकुंभे यांनी संबंधित व्यावसायिकाकडे दरमहा १५,००० रुपये हप्त्याची मागणी केली. हप्ता न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेली.
तडजोडीनंतर दरमहा १२,००० रुपये देण्याचे निश्चित झाले. यासंदर्भात संबंधित व्यावसायिकाने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने सापळा रचून २३ सप्टेंबर रोजी पाचपावली मंदिराजवळील पान टपरीवर १२,००० रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही पोलीस कर्मचारी व त्यांचा पंटर उमेश भटू बारी यांना रंगेहात अटक केली. यात अटक करण्यात आलेले आरोपी : अमोल राजेंद्र पाटील (पोलीस कर्मचारी) जितेंद्र रमणलाल निकुंभे (पोलीस कर्मचारी) उमेश भटू बारी (पंटर) या तिघांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.




















