
जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२५
नाशिक येथील वडनेर रेंजरोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असलेल्या २ वर्षांच्या श्रुतीक गंगाधरन याला बिबट्याने उचलून नेलं. अवघ्या महिनाभरात ही दुसरी घटना असून, यापूर्वी राखीपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ३.५ वर्षांच्या आयुषचा बळी गेला होता.
श्रुतीकचे वडील गंगाधरन हे आर्टिलरी सेंटरमध्ये रेकॉर्ड विभागात कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी श्रुतीक अंगणात खेळत होता, आणि गंगाधरन त्याच्यासमोर होते. अचानक बिबट्याने झडप घालून बालकाला उचलून नेलं. गंगाधरन यांनी आरडाओरड करत बिबट्याच्या दिशेने वस्तू फेकून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण बिबट्या केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीवरून उडी मारून जंगलात पसार झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक, गावकरी, आर्टिलरी सेंटरमधील जवान आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. वनविभागाने थर्मल ड्रोनच्या साह्याने शोधमोहीम सुरू केली आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. याआधी आयुषच्या मृत्यूनंतर देखील नागरिकांनी मोर्चा काढून वनविभागाकडे ठोस कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना झालेली नसल्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी सांगितले की, बालकाचा शोध घेण्यासाठी विभागाकडून पूर्ण प्रयत्न सुरू असून, ड्रोन आणि कर्मचारी घटनास्थळी काम करत आहेत.




















