
जळगाव मिरर । २६ सप्टेंबर २०२५
घराचे बांधकाम सुरु असल्याने त्याठिकाणी गेलेल्या मयूर किशोर काळे (वय ३०, रा. दापोरा, ता जळगाव) या तरुणाचा विजेचा शॉक लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दापोरा गावात घडली. घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील दापोरा गावात मयूर काळे हा तरुण आई-वडील, भाऊ पत्न ी आणि एक मुलगी यांच्या सोबत वास्तव्यास होता. शेतीचे काम करत आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान काही महिन्यांपासून गावात त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मयूर हा बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी काम करतांना अचानक वीजेचा धक्का बसला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब शेजारी राहणाऱ्या काही तरूणांच्या लक्षात आल्याने धाव घेऊन त्याला उचलून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषित केले. मयूरचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ यांनी मोठा आक्रोश केला होता. मयूरचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या नातेवाईकांसह मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















