जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर खराडी परिसरातील पार्टीदरम्यान रंगेहात पकडल्या प्रकरणी राज्यभरात खळबळ उडाली होती. या पार्टीत दारू आणि ड्रग्सच्या वापराचे गंभीर आरोप समोर आले होते. काही महिलाही या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. पोलिसांच्या तपासात, पार्टीतील एका महिलेकडे ड्रग्स आढळल्याचेही स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रकरण रोहिणी खडसे यांच्यासाठीही चर्चेचा विषय बनले आहे. या संदर्भात पुणे पोलिसांना असा संशय आहे की प्रांजल खेवलकर यांना बचावण्यासाठी त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी काही महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये छेडछाड केली असावी.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, रोहिणी खडसे यांनी काही कागदपत्रे तसेच डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. या संदर्भात प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधील व्हॅाट्सॲप डेटा आणि इतर डिजिटल माहिती तपासण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील महत्त्वाचे डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सोनार नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून झाला.
सोनार नावाच्या व्यक्तीने प्रांजल खेवलकर यांच्या नावावर असलेले सिमकार्ड हरवल्याचा दावा केला आणि त्याच नंबरचे दुसरे सिमकार्ड खरेदी करून नवीन मोबाईलमध्ये टाकले. या नव्या मोबाईलच्या माध्यमातून जुना डेटा पूर्णपणे डीलीट केला गेला, ज्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांचा दावा आहे की, सोनारने हे कृत्य रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून केले. मात्र, सोनार कोण आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही आणि या सर्व घटनेची चौकशी करण्यासाठी रोहिणी खडसे यांना बोलवण्यात आले आहे. प्रकरणातील प्रत्येक टप्पा आणि डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू असून, पुढील चौकशीत रोहिणी खडसेंचा नेमका सहभाग समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यात स्पष्ट करण्यात आले की त्याने कोणत्याही अमली पदार्थाचा वापर केला नव्हता. तथापि, प्रकरणाच्या चौकशीत रोहिणी खडसे यांच्याकडून जबाब घेतला जात आहे. पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी विभागाकडून त्यांना नोटीस बजावली असून, गेल्या काही तासांपासून चौकशी सुरू आहे. रोहिणी खडसे चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित असताना, माध्यमांशी बोलणे टाळत आहेत, परंतु योग्यवेळी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यादरम्यान, प्रकरणाची पार्श्वभूमी राजकीय दृष्टीनेही गंभीर ठरली आहे. रोहिणी खडसे यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणामुळे पुण्यात शरद पवारांशी भेट घेतली होती. ही भेट आणि सामाजिक माध्यमांवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर प्रकरणावर विविध प्रतिक्रिया आल्या असून, काही लोकांनी रोहिणी खडसे यांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी चौकशीच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.




















