जळगाव मिरर । ७ ऑक्टोबर २०२५
महराष्ट्रातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने आज जारी केले आहेत. या बदल्यांमुळे रत्नागिरी, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांसह राज्यातील काही महत्त्वाच्या प्रशासनिक पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांची बदली करून त्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंह यांना कुंभमेळा आयुक्त, नाशिक या महत्त्वाच्या पदावर नेमण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
तसेच, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलटे यांची बदली साखर आयुक्त, पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासनिक यंत्रणेतील महत्त्वाच्या पदांवर नवीन जबाबदार अधिकारी रुजू होणार आहेत. राज्य शासनाच्या या आदेशामुळे नाशिक, जळगाव आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या प्रशासनात नवीन गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















