जळगाव मिरर । २४ ऑक्टोबर २०२५
देशातील आंध्र प्रदेश राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसाआधी राजस्थानमध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीत काही प्रवाशांचा जीव गेला होता ती घटना ताजी असताना आता आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक मोठा अपघात झाला. हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या बसला आग लागली. कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या अपघातात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला असून मदतीचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबादहून बंगळूरकडे ४० हून अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटेच्या सुमारास मोटारसायकलची धडक बसताच बसला आग लागली आणि काही क्षणांतच या आगीने संपूर्ण वाहनाला विळखा घातला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, आग लागल्यानंतर बसचा दरवाजा जाम झाला आणि तो उघडला नाही, अशी माहिती डॉ. सिरी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, त्यांनी एकूण २१ लोकांचा शोध घेतला आहे. यापैकी ११ मृतदेहांची ओळख पटली असून, ९ मृतदेहांची ओळख पटणे अद्याप बाकी आहे. बसच्या खिडक्यांमधून उड्या मारून बारा प्रवाशांनी आपला जीव वाचवला, परंतु त्यापैकी अनेकजण भाजले आहेत. मात्र, उर्वरित प्रवाशांना बाहेर पडता न आल्यामुळे ते आगीत अडकून होरपळले.




















