जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२५
ऐन दिवाळी सणात बेवारस रुग्णांना एकटेपणाची भावना वाटू नये, कुटुंबीयांची आठवण येऊ नये म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष क्रमांक १३ येथे बेवारस रुग्णांची स्वच्छता करून कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. या कृतीचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांचेसह उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यांनी कौतुक केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनेक बेवारस रुग्णांवर उपचार करण्यात येतात. त्यांचे नातेवाईक शोधण्यासाठी रुग्णालयातील समाजसेवा विभाग आणि कर्तव्यावरील पोलीस काम करीत असतात. या बेवारसांना वेळेवर भोजन, औषध देण्याचे काम कक्षातील परिचर्या वर्ग व कर्मचारी करतात. दरम्यान, रुग्णालयात बेवारसांसाठी काम करणारे कर्मचारी इसाक बागवान, दानिश बागवान यांनी उमर बागवान यांना सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांच्या सहकार्याने सोबत घेऊन कक्ष क्रमांक १३ येथे जाऊन सर्व बेवारस रुग्णांची अंघोळ घालून त्यांना आपलेपणाची भावना दिली. तसेच, दिवाळीनिमित्त भेटवस्तू देऊन सन्मानित केले. या सेवेमुळे रुग्ण भारावून गेले होते. सामाजिक बांधिलकीच्या या कृतीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, अधिसेविका संगीता शिंदे आदींनी कौतुक केले आहे.




















