जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यातील विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून आता राज्यातील विरोधकांनी आता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.
या बैठकीत राज ठाकरे यांनी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन केले आणि कार्यकर्त्यांना उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे. आम्ही खोट्या मतदारांविरोधात आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढा देत आहोत. त्यांनी पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले की, मोर्चा असा घ्या की गल्ली ते दिल्ली सगळ्यांचे लक्ष मुंबईकडे लागेल. उपस्थित नेत्यांमध्ये बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे आणि यशवंत किल्लेदार यांचा समावेश होता. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोर्चा भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मतदार यादीत तब्बल 96 लाख खोटे मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत. केवळ मुंबईतच 8 ते 10 लाख, ठाण्यात 8 ते 8.5 लाख, आणि पुणे-नाशिकमध्येही हजारो खोटे मतदार वाढवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की, लोकशाहीत जर मतदारच खोटे असतील, तर निवडणुका खऱ्या कशा राहतील? त्यांनी मागणी केली की, जोपर्यंत मतदार यादीतील चुका दुरुस्त होत नाहीत आणि सर्व पक्ष समाधानी होत नाहीत, तोपर्यंत राज्यात कोणतीही निवडणूक घेऊ नये.
राज ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं की, केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हीच पाहिजे या मानसिकतेतून सत्ताधारी खोटे मतदार वाढवून लोकशाहीचा गळा घोटत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला की, आयोगाचे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत आणि निवडणुकीची पारदर्शकता हरवली आहे. ठाकरे यांच्या या वक्तव्याला महाविकास आघाडीने जोरदार समर्थन दिले असून, विरोधक आता एकवटून निवडणूक आयोगावर दबाव आणण्याची रणनीती आखत आहेत.




















