जळगाव मिरर | ६ नोव्हेंबर २०२५
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील व्यावसायिक चंद्रकांत पाटील यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत धमकावून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांना एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. त्या व्यक्तीने “तुमची प्लॉटिंग साईट दाखवा” अशी मागणी केली. पाटील यांनी दुसऱ्या दिवशी दाखवण्याचे सांगितल्यावर, समोरच्या व्यक्तीने “आता रोडवरून तरी दाखवा” असा आग्रह धरला. यानंतर पाटील पाचोरा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ साईट दाखविण्यासाठी गेले असता, आरोपीने त्यांना रिव्हॉल्वर दाखवत धमकावले.
त्याने एका विवाहित महिलेला तिच्या नवऱ्यापासून वेगळं होण्यासाठी सांग, अन्यथा “तुझा गेम करून टाकू”, अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या पाटील यांनी ऑनलाइन दोन हजार रुपये पाठवले. या प्रकरणी पिंपळगाव (हरे) पोलिस ठाण्यात चेतन पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



















