जळगाव मिरर | ७ नोव्हेंबर २०२५
शहरातील मोहन नगर येथील नूतन वर्षा कॉलनीत गुरुवारी (दि. ६ नोव्हेंबर) सायंकाळी एका घरात भीषण आग लागल्याची घटना घडली. घरातील फ्रिजमुळे लागलेल्या आगीत स्वयंपाकघरातील गॅस सिलींडरपर्यंत ज्वाळा पोहोचल्या. मात्र, महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून तीन गॅस सिलींडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन नगरातील नूतन वर्षा कॉलनीत रविंद्र सुखदेव सपकाळे हे वास्तव्यास आहेत. गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील फ्रिजला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत घरातील सर्वच संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. आगीची तीव्रता वाढत स्वयंपाकघरातील गॅस सिलींडरपर्यंत पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे संतोष तायडे, रोहीदास चौधरी, वृक्षभ सुरवाडे, तेजस बडगुजर, गणेश महाजन, महेश पाटील, भूषण पाटील, सत्तार तडवी, विशाल पाटील आणि गौरव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करत नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तीन गॅस सिलींडर वेळेवर बाहेर काढण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला. या आगीत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या असून, मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.



















