जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२५
बोलण्यात गुंतवून ठेवून मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदली केली. त्यानंतर ८९ वर्षीय वृद्धाच्या बँक खात्यातून २८ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणुक केली. ही घटना दि. ६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील राधाकृष्ण नगरात गजानन साहेबराव पाटील हे वास्तव्यास आहे. त्यांच्या वडील साहेबराव ओंकार पाटील (वय ८९) यांचे स्टेट बँकेच्या रिंगरोड शाखेत बचत खाते आहे. या खात्याचे एटीएम कार्ड गजानन पाटील यांच्याजवळ होते. दि. ६ रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास गजानन पाटील हे शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. अनेकदा प्रयत्न करुन देखील एटीएममधून पैसे निघत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले.
अनोळखी इसमाने गजानन पाटील यांना ‘असे करा, तसे करा,’ म्हणत मदत करण्याचा बहाणा करून हातचलाखीने गजानन पाटील यांच्याकडील मूळ एटीएम कार्डची अदलाबदली केली. आणि दुसरे कार्ड त्यांच्या हातात दिले. त्यानंतर लगेच तो अनोळखी व्यक्ती तेथून निघून गेला. गजानन पाटील यांनी पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, कार्ड ‘ब्लॉक’ झाल्याचे स्क्रीनवर दिसले.
कार्ड ब्लॉक झाल्याचे स्क्रिनवर दिसल्यानंतर गजानन पाटील हे तेथून निघून गेले. रात्री त्यांनी वडीलांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासले असता, त्यांना बँक खात्यातून २८ हजार रुपये काढल्याचे दिसून आले. त्यांनी दुसऱ्या दिवशी बँकेत जावून संपर्क साधला. यावेळी त्यांना बँकेतून पैसे काढल्याचे सांगण्यात आले.बँकेच्या व्यवस्थापकांनी गजानन पाटील यांच्या वडीलांचे एटीएम कार्ड ब्लॉक करुन तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर गजानन पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी देखील फसवणूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.



















