जळगाव मिरर | १० नोव्हेंबर २०२५
जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात रविवारी रात्री गोळीबाराची थरारक घटना घडली. जुन्या वादातून झालेल्या या गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर उर्फ टपऱ्या (रा. जळगाव) याचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दि. ९ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास कांचननगर भागात दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद निर्माण झाला. वाद चिघळत जाऊन त्याचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. या गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर (वय २८, रा. कांचन नगर, जळगाव) हा मयत झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर गणेश रविंद्र सोनवणे (वय २६) व तुषार सबसिंग सोनवणे (वय २६, दोन्ही रा. कांचन नगर, जळगाव) असे दोघे जखमी झाले आहेत. घटनास्थळावर तात्काळ स्थानिक नागरिकांची गर्दी झाली.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत गोळीबार करणाऱ्यांमध्ये दोन जणांची नावे समोर येत असून अधिकृत माहिती पोलीसांकडून अद्याप समोर आलेली नाही. तर एलसीबीची टीम देखील गुन्हेगाराच्या शोधार्थ रवाना झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान गोळीबारामध्ये तरुण मृत्युमुखी पडल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.सदर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गनापुरे, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलापूरकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराचा ताबा घेत पुढील तपास सुरू केला आहे.



















