जळगाव मिरर । १० नोव्हेंबर २०२५
जिल्ह्यातील जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांचा आज दि. १० रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मेहरूण तलावाजवळ संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यापासून जामनेर मधील पळसखेडा बुद्रुक शिवारात प्रकाशचंद्र जैन संस्थेच्या आयुर्वेदिक फिजिओथेरपी व होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी रद्द करण्यात आली होती. या महाविद्यालयाची इमारत प्रशासनाकडून अतिक्रमणात असल्याचं सांगण्यात आलं होतं. उद्या म्हणजे मंगळवारी इमारतीचं बांधकाम पाडण्यात येणार होते. मात्र, त्याआधीच संस्थाचालक राजकुमार कावडीया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांनी विषप्राशन केल्याची चर्चा असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच पत्नी आणि मुलाने हॉस्पिटलमध्येच हंबरडा फोडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत पोलिसांकडून किंवा कुटुंबीयांकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. कावडिया यांच्या मृत्यूनंतर विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दि. ६.३० वाजेच्या सुमारास मेहरूण तलावानजीक राजकुमार कावडीया हे फिरण्यासाठी गेले असता त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले व सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.



















