जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२५
चाळीसगाव तालुक्यातील धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात बोरखेडा बुद्रुक येथील एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची ही घटना ११ नोव्हेंबरला दुपारी घडली.
सविस्तर वरुत असे की , चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बुद्रुक येथील भागवत चिंधा पाटील (वय ४९) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास भागवत पाटील हे त्यांच्या बजाज बॉक्सर (एमएच १९, आर- ८८२४) या दुचाकीवरून दहिवद गावाकडे जात होते. भोरस फाट्यावर वळण घेत असताना धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या अशोक लेलँड ट्रक (एचआर- ७४, बी- ०४५०) ने या दुचाकीला जबर धडक दिली.
या अपघातात भागवत पाटील हे गंभीर जखमी झालेत. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून चाळीसगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचे भाचे किशोर शिवाजी पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हवालदार विजय शिंदे करत आहेत.



















