जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२५
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कावीळ आणि निमोनियाने आजारी असलेल्या २ वर्षीय चिमुकलीला रक्ताची तातडीने गरज असताना, रक्त मिळविण्यासाठी सर्वत्र धावपळ झाली. मात्र, कुठेही रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी गावाचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांना संपर्क केला. सरपंचांनी तात्काळ मदतीसाठी गिरीश भाऊ महाजन यांचे आरोग्य दूत शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या एका हाकेवर शिवाजी पाटील यांनी स्वतः रक्तदान करून बालिकेच्या उपचारास मोठी मदत केली.
रक्तासाठी सर्वत्र धावाधाव:
खुशी भानुदास चव्हाण (वय २ वर्षे) ही बालिका जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने रक्ताची गरज होती. रुग्णाचे नातेवाईक रक्त मिळवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करत होते, पण त्यांना रक्त उपलब्ध होत नव्हते. यामुळे त्यांनी मदतीसाठी गावचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांना संपर्क साधला.
आरोग्य दूत ठरले संकटमोचक:
सरपंच प्रल्हाद चव्हाण यांनी वेळ न दवडता, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे आणि गिरीश भाऊ महाजन यांचे आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे पै.शिवाजी पाटील यांना संपर्क केला. शिवाजी पाटील यांनीही अनेक ठिकाणी रक्तपिशवीसाठी प्रयत्न केले. मात्र, निराशाच पदरी पडत होती. अखेरीस, त्यांनी रेड क्रॉसशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्ट केले की, “तुम्ही डोनर उपलब्ध करून द्या, तरच रक्तपुरवठा होईल.”
५६ व्यांदा रक्तदान करून वाचवले प्राण:
रेड क्रॉसच्या या मागणीनंतर क्षणाचाही विलंब न करता, या रक्तसंकटावर मात करण्यासाठी शिवाजी पाटील यांनी स्वतः तिथे जाऊन रक्तदान केले आणि एका ‘डोनर’ची भूमिका पार पाडली. विशेष म्हणजे, यापूर्वीही शिवाजी पाटील यांनी तब्बल ५५ वेळा रक्तदान करून अनेक गरजूंना जीवनदान दिले आहे, आणि हे त्यांचे ५६ वे रक्तदान ठरले. त्यांच्या या तात्काळ प्रतिसादाने आणि मानवतेच्या भावनेमुळे उपचार घेणाऱ्या बालिकेला वेळीच रक्त उपलब्ध झाले आणि तिच्या उपचारात मोठी मदत मिळाली.
कृतज्ञता व्यक्त: शिवाजी पाटील यांच्या या अमूल्य मदतीमुळे बालिकेच्या उपचारातील अडथळा दूर झाला. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवाजी पाटील यांचे आणि त्यांना मदतीसाठी प्रेरित करणारे गिरीश भाऊ महाजन यांचे विशेष आभार मानले. एका चिमुकलीसाठी गावाच्या सरपंचांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, एका आरोग्य दूताने केलेले हे ५६ वे रक्तदान खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायक आहे.




















