जळगाव मिरर | १४ नोव्हेंबर २०२५
जळगाव एमआयडीसी परिसरातील आर. एल. चौफुलीजवळील एन सेक्टरमधील ‘आर्यव्रत’ केमिकल कंपनीला आज सकाळी सुमारे ११ वाजता भीषण आग लागली. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच तिने रौद्ररूप धारण केले असून कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य व अन्य मालमत्ता जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आगीची तीव्रता इतकी मोठी होती की सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतरावरूनही ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आग आटोक्यात आल्यानंतरच यासंबंधीची माहिती मिळेल, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध ठिकाणांहून अग्निशामक दलांची मदत मागवण्यात आली आहे. जळगाव महानगरपालिका, जैन इरिगेशन, वरणगाव, भुसावळ, जामनेर आणि नशिराबाद येथील ८ ते १० अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि आमदार राजूमामा भोळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार भोळे यांनी एमआयडीसी परिसरात आणखी अग्निशामक बंब उपलब्ध करण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, ही घटना पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे समोर आले असून ही दिलासादायक बाब मानली जात आहे.



















