जळगाव मिरर | १४ नोव्हेंबर २०२५
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) समोर महानगरपालिकेने सुरू केलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थी, शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढती दुर्गंधी व प्रदूषणामुळे शिक्षणाच्या वातावरणावरही प्रतिकूल परिणाम होत असून, या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मनपा प्रशासनाकडे करण्यात आली.
या संदर्भात अभाविपच्या जळगाव महानगर शाखेतर्फे आज मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन देण्यात आले. आयटीआय परिसरात उभारण्यात आलेल्या या डेपोमुळे मनपाच्या स्वच्छतेच्या दाव्याची पोलखोल झाल्याचे अभाविपने नमूद केले आहे.
शहरातून दररोज सुमारे ३०१ टन कचरा संकलित होत असून त्यापैकी सुमारे १४० टन कचरा आयटीआयसमोरच तात्पुरत्या स्वरूपात साठवला जात असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून हवा दूषित होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना श्वसनास त्रास, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्याचेही सांगण्यात आले.
अभाविपने मागणी केली आहे की – आयटीआयसमोरचे कचरा संकलन केंद्र तात्काळ अन्य ठिकाणी हलवावे, कचऱ्याची प्रक्रिया आणि विल्हेवाट प्रणाली आरोग्यदायी आणि कायमस्वरूपी पद्धतीने उभारावी, भविष्यात अशाप्रकारे शैक्षणिक संस्था किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा डेपो उभारले जाणार नाहीत, याची मनपाने लिखित हमी द्यावी.
निवेदन देताना महानगर मंत्री चिन्मय महाजन, प्रतीक साळी, मिहीर मालू, अंकलेश व्यास यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. मनपा आयुक्त ढेरे यांनी समस्येची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे अभाविप कार्यकर्त्यांनी सांगितले.
चिन्मय महाजन म्हणाले, “महाविद्यालय प्रशासन व शासनाने महिन्याभरात कचरा संकलन केंद्र हटवण्याची ग्वाही दिली आहे. जर हा निर्णय वेळेत अंमलात आणला नाही, तर विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाला प्रशासनाने तयार राहावे.”



















