जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२५
पत्नी माहेरी निघून गेल्याने मानसिक तणावात असलेल्या समाधान संतोष पाटील (वय ३७, रा. नाचनखेडा, ता. पाचोरा) या तरुणाने विषारी औषध सेवन केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील समाधान संतोष पाटील हा पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता. प्लंबरचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली होती आणि ती घरी येतच नव्हती. या कारणामुळे समाधान पाटील हे मोठ्या मानसिक तणावाखाली होते.
दरम्यान, याच विवंचनेतून दि. १२ नोव्हेंबर रोजी समाधान यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. प्रकृती खालावताच त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे पाटील कुटुंबीय आणि नाचनखेडा गावावर शोककळा पसरली आहे. समाधान यांचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे



















