जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२५
पारोळा शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गु.र. नं. ३०७/२०२४ भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक आरोपीला अटक करून त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या.
जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याचे लक्षात घेऊन मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मा. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी पोउनि. जितेंद्र वल्टे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले.
या पथकातील अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मनोज पाडुरंग गायकवाड (रा. लामकाणी ता. धुळे) हा चोरीच्या मोटारसायकलींसह फिरत आहे. त्यानुसार पथकाने अनेक दिवस त्याच्यावर देखरेख ठेवली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार त्यास लामकाणी येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्यातील एक होंडा शाईन आणि दोन युनिकॉन अशा एकूण ३ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. सर्व तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून संबंधित गुन्हे पारोळा पोलीस स्टेशन व जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत.
ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, तसेच मा. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउनि. जितेंद्र वल्टे, पोह. विष्णु बिऱ्हाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोकॉ. रावसाहेब पाटील आणि चालक दिपक चौधरी यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.



















