जळगाव मिरर । १६ नोव्हेंबर २०२५
खान्देशातील धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहितेने आपल्या दोन मुलांसह आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाळीला मुलासोबत माहेरी आलेल्या गायत्रीने भाऊबिजेला आपल्या एकुलत्या भावाला प्रेमाने औक्षण केले. हसण्या-खेळण्यात गायत्री इतरांसारखी सामान्य दिसत होती. परंतु सासरी गेल्यावर पती व सासऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाचे कोड सुटू शकत नसल्याने तिने शुक्रवारी रात्री आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले. भावासाठी यंदाच्या भाऊबिजेचा टिळा अखेरचा ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, निकुंभे शिवारात १४ नोव्हेंबरच्या पती, सासू सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून गायत्री पाटील या हतबल मातेने आपल्या ५ वर्षांच्या दुर्गा आणि ३ वर्षांच्या दुर्गेश या दोन निरागस कळ्यांना सोबत घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या हा प्रकार उजेडात आल्यानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांची धावपळ सुरू झाली. विहिरीतून जेव्हा त्या आई आणि दोन बाळांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तेव्हा डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.
मृत विवाहितेचा भाऊ गणेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, गायत्री पाटीलचे पती आनंदा चतुर पाटील, सासरे चतुर शंकर पाटील आणि सासू वेनुबाई चतुर पाटील या तिघांनी तिचा छळ करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आहे. या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनगीर पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास सोनगीर पोलिसांकडून केला जात आहे.
गायत्री आणि गणेश यांच्यात भावा-बहिणीचे अत्यंत घट्ट नाते होते. गणेश हा तीन बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ! गणेशला पोलिस बनलेले पाहणे, हे तिचे एक मोठे स्वप्न होते. यासाठी गणेश सराव व अभ्यास देखील करीत होता. तर भाऊ पोलिस व्हावा, यासाठी गायत्री देवाकडे नेहमी प्रार्थना करीत होती. परंतु भाऊ पोलिस होण्यापुर्वीच गायत्री जग सोडून गेल्याने कुटूंबियाचे अश्रू अनावर झाले होते



















