जळगाव मिरर | २० नोव्हेंबर २०२५
कल्याण परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे लोकल प्रवासातील असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. डोंबिवली–ठाणे मार्गावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून लोकलमध्ये झालेल्या मारहाणीचा मानसिक धक्का सहन न झाल्याने 19 वर्षीय अर्णव जितेंद्र खैरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मराठी–हिंदी बोलण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
अर्णव खैरे हा कल्याण पूर्वतील सहजिवन रेसिडेन्सीमध्ये आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. तो मुलुंड येथील केळकर कॉलेजमधील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी तो नेहमीप्रमाणे लोकलने कॉलेजला जात असताना प्रचंड गर्दीत हिंदी भाषेत “थोडा आगे हो…” एवढे बोलल्याचा राग मनात धरत चार-पाच अनोळखी तरुणांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्याला ढकलणे व मारहाण केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अर्णव मानसिकदृष्ट्या हादरला. ठाणे स्टेशनला पोहोचताच तो तत्काळ उतरला आणि नंतर दुसरी लोकल पकडून कॉलेजला पोहोचला. प्रॅक्टिकलला उपस्थित राहिल्यानंतरही मनातील धाकदपटशा कमी न झाल्याने तो अर्धवट कॉलेज सोडून घरी परतला. प्रवासादरम्यान त्याने वडिलांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली. त्यावेळी त्याच्या आवाजातूनही तो मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवत होते.
सायंकाळी सातच्या सुमारास वडील घरी परतल्यावर घर आतून बंद असल्याचे दिसले. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडल्यावर अर्णवने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. तातडीने रुख्मिणीबाई रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी रात्री 9.05 वाजता त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कल्याण, डोंबिवली परिसरात या हृदयद्रावक घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.





















