जळगाव मिरर | २१ नोव्हेंबर २०२५
मालेगाव डोंगराळे परिसरातील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट असून नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवार, दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता, बालाजी पेठ येथील कैलासआप्पा सोनवणे यांच्या घराजवळ हा उपक्रम पार पडला. समाजातील विविध स्तरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चिमुकलीला अभिवादन केले.
कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे, शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमोल सोनवणे, कल्पेश सोनवणे, निलेश तायडे, राहुल जगताप, खुशाल शर्मा, हर्षल चौधरी, चेतन चौधरी, भूषण आंबिकार, संजना राजपूत, नैतिक तिवारी, दिपक सोनार, रुद्र राजपूत, प्रताप चौधरी, सागर इंगळे, कौस्तुभ वाणी, विशाल मराठे, मयुर बोरडे, सिद्धेश भालेराव, साईनाथ सोनार, रोहित इंगळे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महारुद्र वाद्य पथक, जळगाव यांनीही श्रद्धांजली कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
नागरिकांनी या वेळी चिमुकलीच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दिवे प्रज्वलित करून दोन मिनिटे मौन पाळले. “ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा अमानुष कृत्यांचा तीव्र निषेध करतो,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समाजाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आले की, न्याय मिळावा यासाठी एकजूट दाखवूया आणि समाजातील सुरक्षिततेस प्राधान्य देऊया.




















