जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून तब्बल ८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडे आहे.
सविस्तर वृत्त असे की , १५ नोव्हेंबर २०२५ रोजी विलास मधुकर जाधव (वय ६७, रा. जुनी जोशी कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ८४१/२०२५, भा.न.सं. कलम ३०९(४) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हा उलगडण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सततच्या तपासातून २३ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेली ८,००,००० रुपये रोकड त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. यात विजय शांताराम पाटील (वय ४१, रा. कलावसंत नगर, जळगाव) जितेंद्र छोटूलाल जाधव (वय ४४, रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव) जप्ती व आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउपनि. शरद बागल, सोपान गोरे, पोहेकॉ. प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी, सिद्धेश्वर डापकर, रतनहरी गीतें, मयूर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे (स्थागुशा), तसेच नेत्रम व सायबर युनिटचे अधिकारी सहभागी होते.





















