जळगाव मिरर | २७ नोव्हेंबर २०२५
शहरातील एमआयडीसी परिसरात एकाच रात्री सहा दुकानांचे शटर उचकटून तब्बल सहा लाखांची रोकड आणि चांदीचे शिक्के घेऊन फरार झालेल्या चोरट्यांच्या हालचालींचा थरारक तपशील उघडकीस आला आहे. चोरीनंतर त्वरित वेशांतर करून बसमार्गे मध्यप्रदेशात पलायन केल्याची माहिती सीसीटीव्ही तपासातून समोर आली असून, एमआयडीसी पोलिसांनी या टोळीचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे.
रविवारी उशिरा रात्री गुरांच्या बाजारालगत असलेल्या मार्केटमधील सहा दुकानांच्या शटरजवळ जबरदस्तीची चिन्हे आढळल्याने व्यापाऱ्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार चोरटे दुकानांची चोरी करून पायी कालिंका मंदिराकडे जात असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर त्यांच्या हालचाली अधिक रोचक ठरल्या. चोरी केल्यानंतर त्यांनी कपडे बदलून वेशांतर केले. परंतु त्यांच्या हातातील बॅगच्या आधारे पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. त्यांपैकी दोन चोरटे रिक्षाने अजिंठा चौफुली परिसरात गेले, तर उर्वरित दोघे दुसऱ्या रिक्षाने नवीन बसस्थानकात पोहोचले. पुढील तपासात हे सर्वजण नवीन बसस्थानकातून एकाच बसने शिरपूरपर्यंत प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्या बसच्या वाहकाचा शोध घेत चौकशी केली असता, शिरपूर येथे सर्व चोरटे उतरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी खासगी वाहन भाड्याने घेऊन मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका गावात पोहोचल्याचा धागा पोलिसांना लागला.
या माहितीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांची पथके संबंधित गावात पोहोचली. मात्र चोरटे तेथे न मिळाल्याने त्यांचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे. नवीन तांत्रिक पुरावे व सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांचा अचूक मागोवा घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. एमआयडीसी परिसरात घडलेल्या या धाडसी चोरीने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या टोळीला लवकरात लवकर पकडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















