जळगाव मिरर | २७ नोव्हेंबर २०२५
राज्यातील अनेक ठिकाणाहून धक्कादायक घटना घडत असताना आता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दिघवद शिवारात ३४ वर्षीय पित्याने आपल्या दोन चिमुकल्या लेकरांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. दौलत रामभाऊ हिरे, प्रज्ञा (वय ९) व प्रज्ज्वल (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी दौलत यांच्या पत्नीने फिर्याद दिली असून, त्यावरून दौलत यांच्या माता-पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघवद शिवारातील दौलत रामभाऊ हिरे यांनी मुलगी प्रज्ञा व मुलगा प्रज्ज्वल यांच्यासह दिघवद शिवारातील रोकडोबा वस्ती येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी (दि. २६) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. स्थानिक ग्रामस्थ, पोलिस व स्कुबा जवान यांच्या मदतीने विहिरीतील पाण्यात शोधकार्य करुन तिघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.





















