जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२५
राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरु असताना आता भंडारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या एका महिला उमेदवाराने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर भाजपची टोपी व गळ्यात कमळाचा गमच्छा टाकल्याचा संतापजनक प्रकार केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी भाजपवर शरसंधान साधले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्याच पक्षात आहेत, हे दाखवण्याचा हा भाजप उमेदवाराचा केविलवाणा प्रकार आहे, असे त्या म्हणाल्यात.
भंडारा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येथे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार प्रत्येक प्रभाग पिंजून काढत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. भंडारा शहरात मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. प्रभाग 2 मधील भाजपच्या महिला उमेदवार प्रचारात या पुतळ्याला वंदन करण्यासाठी आल्या. त्यांनी महाराजांना वंदन करत असताना त्यांच्या गळ्यात कमळाचा गमच्छा अर्थात रुमाल घातला. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी भाजपची टोपीही छत्रपतींच्या जिरेटोपावर घातला. त्यांच्या या कृतीमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्रासाठी नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहे. हे नाव राजकारणात आवर्जुन घेतले जाते. पण भंडाऱ्यातील भाजपच्या एका महिला उमेदवाराने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भाजपची टोपी व कमळाचा गमच्छा घातल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियात या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे.




















