जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२५
पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कंत्राटी अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३१) आणि त्याचा पंटर सागर शांताराम कोळी (वय ३०, रा. निंभोरा, ता. धरणगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी रंगेहात पकडले. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदारास सन २०२४-२५ या ब्लॉकमध्ये पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पहिला हप्ता १५ हजार रुपये ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या खात्यात जमा होऊन त्यांनी त्यातून घराचे बांधकामही केले. मात्र दुसरा हप्ता मिळण्यात उशीर होत असल्याने त्यांनी पंचायत समिती, धरणगाव येथे चौकशी केली.
या वेळी अभियंता गणेश पाटील यांनी निधी नसल्याचे सांगितले. परंतु गावकऱ्यांकडून तक्रारदारास दुसरा हप्ता मंजूर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ८ जुलै रोजी पुन्हा पंचायत समितीत जाऊन चौकशी केली असता अभियंत्याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार पडताळून सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान अभियंता पाटील यांनी पंटर सागर कोळीमार्फत लाच स्वीकारण्याची तयारी दाखवली. कोळीनंही रक्कम घेण्यास संमती दर्शवत प्रोत्साहन दिले. ACB च्या पथकाने दोघांना दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पुढील तपास सुरु आहे.




















