जळगाव मिरर । ४ डिसेंबर २०२५
राज्यभरातील अनेक तरुण तरुणी सोशल मिडियावर अनेक प्रकरणाचे व्हीडीओ टाकून मोठ्या चर्चेत येत असतात पण एक तरुणी सध्या आपल्या चुकीच्या कृत्यामुळे सोशल मिडियावरील प्रतिमा खराब झाली आहे. सोशल मीडियावर रील्स बनवून हवा करणारी आणि 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेली एक तरुणी प्रत्यक्षात सराईत गुन्हेगार निघाली आहे. एसटी बसमधील सहप्रवासी महिलांना लुटणाऱ्या या ‘रीलस्टार’ तरुणीला आणि तिच्या प्रियकराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. कोमल नागनाथ काळे (वय 19) आणि तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी (वय 25) अशी या ‘बंटी-बबली’च्या जोडीची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि महागडे मोबाईल असा तब्बल 9 लाख 35 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 19 नोव्हेंबर रोजी अलका मुकुंद पालवे या पाथर्डी ते कल्याण एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका अनोळखी तरुणीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पाथर्डी बसस्थानक परिसरात सापळा रचून कोमल काळे हिचा शोध घेतला आणि तिला ताब्यात घेतले.
पोलिसांनी कोमलची कसून चौकशी केली असता, तिने चोरी केलेले दागिने आपला प्रियकर सुजित चौधरी (रा. शेवगाव) याच्याकडे दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुजितला त्याच्या घरातून अटक केली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, कोमलने चोरीच्या पैशांतून 1 लाख 70 हजार रुपयांचा ‘आयफोन 17 प्रो मॅक्स’ आणि 15 हजार रुपयांचा ओप्पो मोबाईल खरेदी केला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून 6.5 तोळे सोने, दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. ही जोडी सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. कोमल आणि सुजित यांनी अमरापूर-शेवगाव आणि पाथर्डी-भगूर बसमध्येही चोरी केल्याची कबुली दिली. कोमलवर यापूर्वी शेवगाव, सुपा आणि बीडमधील शिरूर कासार येथे गुन्हे दाखल आहेत. तर तिचा प्रियकर सुजित चौधरी याच्यावर दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी असे गंभीर 8 गुन्हे दाखल आहेत. या दोघांवर मिळून एकूण 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




















