जळगाव मिरर । ५ डिसेंबर २०२५
मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी गणेश भगवान माळी (वय ३१) यांच्यासह सुनिल रामदास सुरवाडे या दोघांच्या घरात डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास सोनी नगरात उघडकीस आली. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चार चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांकडून त्या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगरात गणेश माळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा भाऊ इलेक्शन कॅम्पीनिंगचे काम करीत असल्याने दोघ भाऊ गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून रावेर येथे मुक्कामी होते. दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास गणेश माळी हे कुटुंबियांसह त्यांच्या मूळ गावी गेले होते. दरम्यान, आज सकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आशा भोई यांनी फोन करुन तुमच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला असल्याचे सांगितले. त्यानुसार माळी हे कुटुंबियांसह तात्काळ घरी परतले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरी आल्यानंतर गणेश माळी यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना वरच्या मजल्यावरील बेडरुममधील कपाटात ठेवलेली सोन्याचे दागिने आणि रोकड दिसून आली नाही. तर कपाटातील सामान देखील अस्ताव्यस्त फेकलेला होता. तसेच कपाटाच्या लॉकरचे लॉक तोडून चोरट्यांनी त्यामध्ये ठेवलेली रोक ड आणि सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे त्यांना दिसले. चोरट्यांनी गणेश माळी यांच्या घरातून ३ तोळे सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, ६ ग्रॅमचे कानातील टॉप्स चोरुन नेल्यानंतर चोरट्यांनी त्याच गल्लीत राहणाऱ्या सुनिल सुरवाडे यांचे बंद घर देखील फोडले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची उघडकीस आली. एकाच दिवशी दोन घरांमध्ये चोरी झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.




















