जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
राज्यभरातील अनेक शहरातून अल्पवयीन मुलीसह विवाहितेचे गायब होण्याचे प्रमाण वाढले असताना आता बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून तिन्ही अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या गायब झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. घरच्यांना टेक्निकल क्लासला जातो, असे सांगून या मुली घराबाहेर पडल्या; पण त्यानंतर परतच घरी आल्या नाहीत. त्यांना शेवटचं पाहिलं गेलं ते बसस्थानकात, आणि त्यानंतर त्यांचा कुठलाही ठावठिकाणा सापडलेला नाही. या घटनेमुळे सुनगाव परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोणत्याही प्रकारचा संपर्क न येता तीन मुली एकत्र बेपत्ता झाल्याने पालक आणि स्थानिक नागरिकात चिंता वाढली आहे.
गायब झालेल्या मुली या तीघीही मैत्रिणी असून त्यांचे वय अंदाजे 16 वर्षे आहे. नियमितप्रमाणे त्या शिक्षणासाठी बाहेर पडल्या होत्या. काही मैत्रिणींनी त्यांना सकाळी जळगाव जामोद बसस्थानकात पाहिल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्या कुठे गेल्या, त्यांच्या हालचाली काय राहिल्या, याबाबत पोलिसांनाही कोणतीही माहिती मिळालेली नाही. यामुळे तपास आणखी गुंतागुंतीचा झाला असून, सर्वत्र शोधमोहीम सुरू आहे. मुली घरी न आल्याने पालक मोठ्या ताणात आहेत.
पालकांनी मुली बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच ताबडतोब जळगाव जामोद पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली. मात्र मुलींचा ठावठिकाणा मिळत नसल्याने हा तपास पोलिसांसाठी कठीण होत चालला आहे. यामध्ये जबरदस्तीने किंवा फुस लावून नेण्याची शक्यता पोलिसांच्या तपासात आढळल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन अल्पवयीन मुली एकत्र गायब होणे हा गंभीर सुरक्षेचा विषय असल्याने सर्व स्तरावरून लक्ष या तपासाकडे लागले आहे.
यामध्ये आणखी एक माहिती समोर आली आहे. या तिन्ही मुलींना ज्या शाळेत शिकत होत्या, त्या शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या काही वर्तनावरील शंका आणि इतर कारणांमुळे पालकांना शाळेत बोलावले होते. ही माहिती मुलींना कळल्यावरच त्या अचानक घरातून बाहेर पडल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, तीनही मुलींनी आपापले बँक पासबुक सोबत घेतले. त्यामुळे त्यांनी घर सोडणे अचानक नव्हते, तर काहीतरी योजना करूनच हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता अधिक मजबूत होते. मात्र नेमकं कारण काय? त्यांना कोणी फुस लावली का? त्या स्वयंस्फूर्तीने निघून गेल्या का? हे सर्व तपासून पाहिले जात आहे.





















