जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२५
उत्तर गोवा जिल्ह्यातील अरपोरा परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका नाईट क्लबमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटातून भीषण आगीची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृतरित्या मिळाली असून, जखमींची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. ही आग रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास लागली.
घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार मायकल लोबो तातडीने घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन महिला तसेच ३ ते ४ पर्यटकांचा समावेश आहे. “तिघांचा मृत्यू भाजल्यामुळे तर उर्वरितांचा मृत्यू गुदमरून झाला,” असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, “दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
प्राथमिक माहितीनुसार, सदर नाईट क्लबने अग्निसुरक्षेचे आवश्यक नियम पाळले नसल्याचे समोर येत आहे. सततच्या गर्दीमुळे आणि क्लबमधील बंदिस्त जागेमुळे धूर व ज्वाळा काही मिनिटांतच पसरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले.
गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत २३ मृतदेह मिळाले असून, मृतांमध्ये बहुतेक नाईट क्लबचे कर्मचारी आहेत. डीजीपी यांनी स्पष्ट केले की, आग सर्वात आधी तळमजल्यावरील स्वयंपाकघरातून सुरू झाली व काही मिनिटांत क्लबसह संपूर्ण इमारतीत पसरली. त्यामुळे जास्तीत जास्त मृतदेह स्वयंपाकघराच्या परिसरात आढळले. तसेच जिन्यावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात दोन जणांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला असून, आज सकाळी फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) चं पथक आग लागण्याचे मूळ कारण व स्फोटाचे स्वरूप तपासणार आहे. वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, पोलीस व अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत.
मुख्यमंत्री सावंत यांचा शोकसंदेश
सीएम सावंत यांनी X (माजी ट्विटर) वर पोस्ट करून म्हटले— “आजचा दिवस गोव्यासाठी अत्यंत दुःखद आहे. अरपोरा येथील आगीत २३ जणांचा मृत्यू झाला. मी पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. घटनेची चौकशी सुरू असून, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही, याची तपासणी केली जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
या भीषण दुर्घटनेमुळे गोवा राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पर्यटन हंगामात झालेल्या या घटनेने प्रशासनासह स्थानिक नागरिकांमध्येही चिंता निर्माण केली आहे.




















